नाशिक - भारतीय क्रीडा जगताचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा मिल्खा सिंह यांचे नाव सर्वात अव्वल स्थानी घेतलं जाईल. कारण ते देशाचे पहिले ट्रॅक अँड फील्ड सुपरस्टार खेळाडू होते. मिल्खा सिंह यांचं शुक्रवारी रात्री चंदीगड येथे निधन झालं. त्याच्या निधनावर नाशिकची आंतराष्ट्रीय धावपटू 'सावरपाडा एक्सप्रेस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कविता राऊत हिने देखील शोक व्यक्त केला.
आमच्यासाठी ते आदर्श होते...
मिल्खा सिंग यांचे जाणं ही कधी नं भरून निघणारी पोकळी आहे. आम्ही त्यांना आदर्श मानून पुढे जात होतो. त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे धावपटू सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हिने म्हटलं आहे.
मिल्खा सिंह यांच्याविषयी थोडक्यात...
मिल्खा सिंह यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. मिल्खा सिंह यांनी १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २०० आणि ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. त्यानंतर त्यांनी १९६२ मधील जकार्ता येथे झालेल्या आशियाई खेळामध्ये ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. १९५९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा - 'फ्लाईग सिख' मिल्खा सिंह यांचे निधन; क्रीडा विश्व हळहळले
हेही वाचा - WTC FINAL : टीम इंडियाकडून भर मैदानात मिल्खा सिंहांना अनोखी श्रद्धांजली