मनमाड (नाशिक) - कोरोनाचे सावट यंदा श्रावण सोमवारवरही दिसून आले आहे. मनमाड शहरापासून जवळच असलेल्या नागापूर या गावात नागेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन आहे. येथील व अंकाई किल्ल्यावरील अगस्ती ऋषी मंदिराचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.
नागेश्वर महादेव मंदिर हे द्रविडकालीन म्हणजे सुमारे ९०० वर्षांपूर्वी उभारले गेले आहे. औरंगजेबाच्या काळात मंदिरे उध्वस्त करण्यात येताना हे मंदिर जमिनीत पुरून टाकल्याची आख्यायिका आहे. या ठिकाणी दर महाशिवरात्री, श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी व शनिवारी तसेच दत्त जयंती व नागपंचमीला मोठा यात्रोत्सव भरतो.
जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातीलदेखील भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 5 महिन्यापासून मंदिर बंद आहे. त्यामुळे नागपूर ग्रामस्थ व मंदिर प्रशासनाने यंदाचा यात्रोत्सव रद्द केला आहे. अंकाई किल्ल्यावर अगस्ती मुनींचे मंदिर आहे. येथेही श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व शनिवारी मोठा यात्रोत्सव भरतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंकाई ग्रामस्थ आणि अगस्ती मुनी मंदिर ट्रस्टतर्फे यावर्षीचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. दोन्ही मंदिराच्या विश्वस्तांनी साध्या पद्धतीने विधिवत पूजा केली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वच धार्मिक स्थळ बंद असल्याने भक्तांमध्ये नाराजी आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर होवून मंदिरे खुले व्हावेत, अशी भाविकांमधून अपेक्षा करण्यात येत आहे.
दरम्यान, टाळेबंदी 1 खुली होताना सरकारने धार्मिक कार्यक्रमावरील बंदी कायम ठेवली आहे. तसेच सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर गर्दी करण्यावर निर्बंध लागू केले आहेत.