नाशिक - मुस्लीम समाजाला असलेल्या पाच टक्के आरक्षणाची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अन्यथा रस्तावर उतरून आंदोलन करू, असा इशारा मुस्लीम उत्कर्ष समितीतर्फे देण्यात आला. नुकताच नाशिक येथे मुस्लीम उत्कर्ष समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या आहेत मागण्या -
राज्यात मराठा आरक्षणावरून वातवरण तापले असताना मुस्लीम समाजदेखील आरक्षणाच्या मुद्यावरून एकजूट झाला आहे. नाशिकमध्ये जिल्हा मुस्लीम उत्कर्ष समितीची बैठक नुकताच पार पडली. या बैठकीत मुस्लीम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. न्यायालयाने मुस्लीम समाजाला दिलेल्या पाच टक्के आरक्षणाची सरकारने अंमलबजावणी करावी, मुस्लीम समाजतील युवकांना शिक्षण आणि नोकऱ्यात आरक्षण मिळावे, बार्टी व सारथीच्या धर्तीवर मुस्लीम समाजासाठीही संस्था स्थापन करुन 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, प्रत्येक तालुक्यात कब्रस्थानासाठी जागा द्यावी, मौलाना आझाद विकास महामंडळासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, यासह आदी मागण्या यावेळी बैठकीत करण्यात आल्या.
आमदाराच्या घराबाहेर करणार आंदोलन -
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर ग्रामीण अध्यक्षपदी सादिक पठाण, तर नाशिक शहर व मालेगावच्या शहराध्यक्षपदी आणि हनिफ बशीर शेख यांची निवड करण्यात आली. यावेळी मुस्लीम समाजाच्या विविध मागण्यांसाठी प्रत्येक आमदाराच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती हनिफ शेख यांनी दिली.
हेही वाचा - उद्या 'भारत बंद'ची शेतकरी संघटनांची हाक; 'या' पक्षांनी दर्शवला पाठिंबा