नाशिक - म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (काल) तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवीण गणपत काकड (वय २८, रा. गुलमोहर नगर, म्हसरुळ, पंचवटी) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती आहे. सायंकाळच्या सुमारास म्हसरुळ लिंकराेडवरील खिळ्यांच्या कारखान्या मागील मोकळ्या भुखंडावर मद्यपार्टी करताना मागील वादातून अज्ञात संशयितांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने जामीनावर केली होती मुक्तता
एका गंभीर गुन्ह्यात मृत प्रवीणची काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली हाेती. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. घटनास्थळी अनेक मद्याच्या बाटल्या व एक माेपेड दुचाकी पाेलिसांना आढळून आली आहे. प्राप्त माहितीनुसार मृत काकड व संशयित मारेकऱ्यामध्ये काही दिवसांपूर्वी शाब्दिक चकमक झाली होते. त्याचे पर्यावसन वादात झाले हाेते. त्यातून ही हत्या झाल्याचे समजते. म्हसरुळ मखमलाबाद गाव येथे नव्यानेच भाईगिरी करणारे संशयित असल्याचे समजते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरु होते.
हेही वाचा - नागपुरात महिला पोलीस शिपायाची आत्महत्या