नाशिक - कोरोनाच्या दुसर्या लाटेत देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण नाशिकमध्ये होते. तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगत तयारी केली आहे. कोरोनाचे रुग्ण जरी कमी झाले असले तरी नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा धोका कायम आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 676 रुग्ण आढळून आले आहेत. सद्य स्थितीत 180 रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 432 रुग्ण यावर यशस्वी मात करून घरी परतल्याने आरोग्य विभागाला थोडा दिलासा मिळाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यात 64 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस आटोक्यात आणण्याचे जिल्हा आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान आहे. हा वाढता धोका बघता कोरोना बाधित रुग्णांनी म्युकरमायकोसिसची लक्षण आढळल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी नागरिकांना केले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उद्योगांना आक्सिजन देण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा सहन करणाऱ्या उद्योगांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना होणारा ऑक्सिजन पुरवठा 100 टक्के बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे ऑक्सिजनची निगडित उत्पादन घेणाऱ्या उद्योगांना मोठा फटका बसला होता. अनेक उद्योजकांनी ऑक्सिजन मिळत नसल्यानं कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जिल्हा प्रशासनाने आधी 20 टक्के ऑक्सिजन उपलब्ध करून दिल्यानंतर आता रुग्ण संख्या कमी झाल्याने 100 टक्के ऑक्सिजन हा उद्योगांना मिळत असल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.
सद्यस्थितीत 2 हजार 465 रुग्णांवर उपचार सुरू..
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 83 हजार 516 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 2 हजार 465 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 46 ने घट झाली असून आत्तापर्यंत 8 हजार 343 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.