नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचे करोडो रुपयांचे नुकसान झालं आहे. मात्र, दुसरीकडे याच लालपरीने मालवाहतूकीच्या माध्यमातून जवळपास एकवीस लाखाचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळवून दिले आहे. लालपरीला मालवाहतुकीच्या माध्यमातून का होईना आर्थिक रुळावर येण्यास मदत झाली आहे.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून एसटी महामंडळाने मालवाहतुकीची सुरुवात केली. या लालपरीने राज्याच्या कानाकोपऱ्यात 543 फेर्यांच्या माध्यमातून 21 लाखाचे उत्पन्न मिळवले. प्रवाशांच्या सदैव सेवेत तत्पर असणाऱ्या एसटी बसने प्रवाशांसह आता मालवाहतुकीत देखील यशस्वी कामगिरी बजावली आहे.
कोरोनाच्या काळात एसटीच्या चाकांनीं मालवाहतुकीसाठी तब्बल 90 हजार किलोमीटरचा प्रवास करून यशस्वीरित्या मालवाहतूक करण्याचे काम केले आहे.
नाशिक शहरातील एमआयडीसी कंपनी, कृषी व शेतीमाल तसेच छोटे-मोठे कारखानदार,लघुउद्योजक हे आपला माल आता एसटीबस मधून पाठवण्यास इच्छुक आहेत.नाशिकच्या एसटी बसेस जळगाव,रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा,पुणे या भागात सुरक्षित आणि माफक दरात मालवाहतूक करत आहेत. या एसटीच्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.