नाशिक - दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात एका 25 वर्षीय विवाहितेने आपल्या सात वर्षीय मुलाचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एका व्यक्तीच्या जाचाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - येवल्यात 4 एकर डाळिंब बागावर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड, कोरोना महामारीमुळे ओढावले संकट
वनारवाडी गावात संगिता प्रकाश पवार (वय 25 रा. मंगरूळ ता. चांदवड) ही आपला मुलगा कार्तिक प्रकाश पवार (वय 7) याच्यासोबत भाड्याच्या खोलीत राहत होती. तिच्यासोबत एक व्यक्ती देखील राहत होती. ही व्यक्ती नेहमी दारू पिऊन मारहाण व शिवीगाळ करीत असल्याने त्याच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून संगीता पवार हिने गुरुवारी 4 ऑगस्ट रोजी आपला मुलगा कार्तिक याला गळफास दिला व स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना उघडकीस आल्यानंतर दिंडोरी पोलिसांनी संगिता पवारविरुद्ध तिचा मुलगा कार्तिक पवार यास गळफास दिल्याबद्दल खुनाचा गुन्हा दाखल केला, तर सोबत राहणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहे.
हेही वाचा - नाशिक : सराफ दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना अटक