नाशिक - रेल्वेतून मोबाईल लांबवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात इगतपुरी पोलिसांना यश मिळाले आहे. त्यांच्याकडून एकूण 2 लाखांचे 16 मोबाईल आणि धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आले आहेत.
दिंडोरी येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेणारा तुषार पवार हा नांदेड ते मुंबई तपोवन एक्सप्रेसने प्रवास करत होता. इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ अज्ञाताने तुषारचा मोबाईल लांबवला होता. याबाबत इगतपुरी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास चक्रे फिरवत अवघ्या काही तासात इगतपुरीतील राहुल साळवे, ललित मोरे, विशाल आतकारी यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडून दोन लाखांचे 16 मोबाईल फोन आणि धारदार शस्त्रे मिळून आली आहेत. तसेच ताब्यात घेतलेला आरोपी राहुल साळवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर इगतपुरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे ५ गुन्हे आणि घोटी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.
संबंधित आरोपींकडून इगतपुरी रेल्वे स्थानकावर झालेल्या अनेक चोरीचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्यासह हवालदार कातोरे, घरटे, निकम यांनी ही कामगिरी बजावली.
रेल्वेच्या दरवाज्यात बसून प्रवास करू नका -
रेल्वे प्रवास करताना जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दरवाजात बसून प्रवास करत असल्याने चोरांना मोबाईल चोरीची जास्त संधी मिळते. त्यामुळे देखील मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते आहे. प्रवाशांनी दरवाजात उभे राहून अथवा बसून प्रवास करू नये, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे.