नाशिक - कळवण व सुरगाणा तालुक्यातील शेवटच्या माणसापर्यंत कोरोना लस मिळेपर्यंत ही लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. कोरोना लस सुरक्षित आहे. तालुक्यातील जनतेने कोरोनापासून सुरक्षा मिळविण्यासाठी मनात कोणतीही शंका न बाळगता लसीकरण करावे, असे आवाहन कळवणचे आमदार नितीन पवार यांनी केले.
कळवण उपजिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा व लसीकरणचा आमदार पवार यांनी आढावा घेतला. आमदार पवार यांच्यासमवेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरदसिंग परदेशी उपस्थित होते. कळवण तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून अभोणा व मानूर येथील कोरोना सेंटरच्या बेडची संख्या वाढवून तेथे सक्षम आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करावी व तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा हस्तांतरित करुन कोरोनाबाधित रुग्णांचे तेथे विलगीकरण करावे, अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण थोरात यांच्याकडे यावेळी केली. कळवण तालुक्यात कोरोना लसीकरणाचे काम पूर्ण क्षमतेने वेगात सुरू असून नागरिका लसीकरणासाठी तत्परतेने पुढे येत आहे. आमदार नितीन पवार यांनी कळवण उपजिल्हा रुग्णालय व ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण केंद्राची पाहणी करुन आरोग्य यंत्रणेशी व नागरिकांशी संवाद साधला. कळवण उपजिल्हा रुग्णालयात आमदार नितीन पवार यांनी कोरोना लस घेतली.