नाशिक : यावर्षी नाशिक शहरावर कोरोनाच सावट गडद असल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव टळावा म्हणून 'मिशन विघ्नहर्ता' राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने एक अॅप विकसित करण्यात आलं आहे. यात नाशिककरांना शहरातील मानाच्या गणपतींचे घरबसल्या दर्शन मिळत असून मूर्ती विसर्जन, पुजाविधींची माहिती यांसह विविध स्पर्धा आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत.
नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने अनेक उपायोजना केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने मिशन विघ्नहर्ता राबवण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत नाशिककरांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात गणेशोत्सवादरम्यान केल्या जाणाऱ्या पूजा विधींची ऑनलाईन माहिती, शहरातील मानाच्या गणपतीचे मुखदर्शन घरच्या घरी, मूर्ती विसर्जन करायचे असल्यास त्यासाठी पावडर उपलब्ध करून देण्यात येते आहे.
जलप्रदूषण रोखण्यासाठी मूर्ती संकलन आणि नाशिककरांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पर्यावरणपूरक गणेश उत्सव ही स्पर्धा राबवण्यात येते. यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने शहरातील काही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन एक ॲप विकसित करण्यात आले आहे. त्याद्वारे नागरिकांना या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दरम्यान यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या मिशन विघ्नहर्ता या उपक्रमाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागाच्या संचालिका कल्पना कुटे यांनी केले आहे.
या मिशन विघ्नहर्ता उपक्रमाला नाशिककरांचा भरभरून प्रतिसाद लाभत असल्याचे देखील संबंधित विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच मिशन विघ्नहर्ता उपक्रमाअंतर्गत नाशिक शहरातील जल प्रदूषण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा - नाशिकच्या ठक्कर डोम कोविड केअर सेंटरमध्ये गणेशोत्सव, महिला रुग्णाच्या हस्ते बाप्पाची स्थापना