नाशिक : त्र्यंबकेश्वर पहिने येथील खाजगी संस्थेच्या वस्तीगृहातील अल्पवयीन मुलींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचण्यास सांगितले जात असल्याची तक्रार पालकांनी केल्याने, एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पालकांनी मुलींना घरी आणले आहे. तसेच याप्रकरणी संस्थेचे चालक आणि शिक्षकांविरोधात वाडीवरे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाजगी संस्थेची ही आहे ओळख : मिळालेल्या माहितीनुसार, पहिने येथे एका खाजगी संस्थेची काही वर्षापासून कायमस्वरूपी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. या शाळेला जोडून यंदा मुलींसाठी वस्तीगृह सुरू करण्यात आले आहे. शाळा सुरू होण्यास पंधरा दिवसांचा कालावधी असताना वस्तीगृहात सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना 31 मे 2023 पासून प्रवेश देण्यात आला. सुट्टीत मुलींना पारंपारिक नृत्य व संगणक शिक्षण दिले जाणार असल्याचे संस्थेने सांगितले होते. प्रत्यक्षात संगणक शिक्षण दिले नसल्याचा आरोप मुलींनी केला आहे. संस्थेची सहावी पर्यंतच शाळा असल्याने या मुलींना त्र्यंबकेश्वर येथील शाळेत शिक्षणासाठी पाठवले जाते. पालकांनी मुलींसाठी प्रत्येकी साडेतीन हजार रुपये अनामत रक्कम देखील जमा केली आहे.
जबरदस्तीने नाचण्यास सांगतात : शाळेमागील टेकडीवर हॉटेल असून येथे मे महिन्याच्या अखेरीस काजवे बघण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्यासमोर सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान नाचण्यास सांगितले. नाचले नाही तर शिक्षिका संस्था चालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात व छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली. पालकांनी याबाबत वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या मुलींना आता दुसऱ्या शाळेत दाखल केल्याचे पालकांनी सांगितले.
मुलींना नाचण्यास सांगितलं नाही : वस्तीगृहाच्या शिक्षिका मुलींना पारंपारिक नृत्य शिकवत असताना पर्यटक ते पाहत असतील, परंतु मुलींना कोणत्याही प्रकारे इतरांसमोर नाचण्यास सांगितले नाही,असे शाळेच्या एका शिक्षकाने सांगितले आहे.
हेही वाचा -
- Hostel Superintendent Suspend मुंबईतील शासकीय वस्तीगृहात विद्यार्थिनीच्या खून प्रकरणी अधीक्षक निलंबित
- Trimbakeshwar Temple Nashik त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
- Trimbakeshwar temple entry row त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसणाऱ्यांविरोधात कारवाई करा अन्यथा राज्यातील मंदिरे दोन दिवस बंद हिंदू महासभा