नाशिक - शिर्डी येथे वास्तव्यास असलेल्या मात्र नाशिक रोड येथे मामाच्या घरी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर श्रीरामपूर येथील दोघा तरुणांनी बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यासंदर्भात नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्डी येथील अल्पवयीन मुलगी उपनगर भागात असलेल्या मामाकडे सुट्टीसाठी आली होती. ती १८ एप्रिलला उपनगर हद्दीतून हरवल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिली होती, त्यानंतर पोलीस ह्या मुलीचा शोध घेत होते. श्रीरामपूर येथील अविनाश माकुने आणि संतोष खरात यांनी या मुलीला फूस लावून नाशिक येथून पळवून नेत, सिन्नर मार्गे मालेगाव व तेथून बसने सुरतला एका फ्लॅटमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर नवी मुंबई येथील घनसोली येथे नेल्यावर अविनाश माकुने यांनी मद्यप्राशन करून बलात्कार केला. यावेळी मुलीने विरोध केला असता, तिचे हात-पाय बांधून चाकूचा धाक दाखवत पाशवी बलात्कार केला.
१९ मे रोजी मुलगी संगमनेर येथे आल्यावर तिने फोन करून नातेवाईकांना घटनेची माहिती दिली,यानंतर मुलीच्या नातेवाइकांनी मुलीची सुटका करून संशयित आरोपी अविनाश माकुने याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले, यानंतर मुलीच्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी आज अविनाश माकुने व संतोष खरात यांच्या विरोधात सामूहिक बलात्कार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संशयित आरोपी संतोष खरात याचा पोलीस शोध घेत आहेत.