नाशिक - इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात आले. तिच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवले. मात्र, ती गर्भवती राहिल्याचे समजल्यानंतर मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या श्रमीकनगर भागातील ही घटना आहे.
श्रमीकनगर भागातील तरुणाचे अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध
सध्या सोशल मीडियाचा वापर करत तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. नाशिकमध्येही अशीच घटना घडली. काही महिन्यापूर्वी सातपूरच्या श्रमिकनगर भागात राहणाऱ्या संशयित सुनील ठाकरे (27 वर्ष) या तरुणाने आपल्याच परिसरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीसोबत इन्स्टाग्रामवरून मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. यानंतर तिला घरी बोलावून तिच्यासोबत असुरक्षित शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार फेब्रुवारी महिन्यात घडला होता. मात्र, असुरक्षित संबंधातून ही मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. दरम्यान, सातपूर पोलिसांनी याचा तपास करत मुलीच्या जबाबावरून संशयित सुनील ठाकरे याला अटक केली आहे.
संशयिताला 5 दिवसांची पोलीस कोठडी
याप्रकरणी संशयित सुनील ठाकरेच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडीची सुनावली आहे. मात्र, घडलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवले जातील - अॅड. प्रकाश आंबेडकर