नाशिक : दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारी वाढत आहे. नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीची विक्री झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी 15 वर्षाची आहे. पीडित मुलीच्या आईला 20 मे रोजी प्रियदर्शनी निकम आणि प्रवीण अहिरे यांनी मुलीला केटरिंगच्या नोकरीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. 21 मे रोजी प्रियदर्शनी आणि प्रवीण या पीडित मुलीला रिक्षात बसवून घेऊन गेले. ते पीडितेला आळंदी येथे घेऊन गेले. आळंदी येथे सुरज व त्याच्या आई-वडिलांसह सुनील नावाचा एजंट आला. त्यांनी पीडितेला खोटे लग्न लावत असल्याचे सांगून सूरजने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. यानंतर पीडितेला एजंटने सुरज व त्याच्या आई वडिलांसोबत कर्नाटकातील रायचूर येथे पाठवून दिले.
शारीरिक संबंधासाठी बळजबरी : संशयित सुरज याने पीडीतेवर सलग आठ ते नऊ दिवस शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला. मात्र पीडितेने सातत्याने नकार दिल्याने सुरजने तिला विकणाऱ्या प्रियदर्शनीला फोन करून सांगितले. सूरज व त्याचे वडील पुण्याच्या बस स्थानकावर गेले. त्या ठिकाणी पीडितेने बचावासाठी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मात्र पोलीस येताच संशयित एजंटने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर सुरज मुलीला घेऊन नाशिकला आला.
संशयितांविरोधात गुन्हा दाखल : पीडित मुलगी नाशिकमध्ये आल्याची माहिती मिळतात तिचे भाऊ, भाचा, आजोबा जिल्हा रुग्णालयात आले. त्या ठिकाणी सुरज व त्याचे वडील ललित, प्रियदर्शनी व प्रवीण त्यांच्यासोबत पिडीतेच्या नातेवाईकांचा वाद झाला. त्यानंतर सुरज आणि त्यांच्या वडिलांनी पळ काढला, मात्र मुलीला विकणाऱ्या प्रियदर्शनी व प्रवीणला सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच संशयितांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :