नाशिक - पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या ब्रह्मगिरी पर्वत रांगातील संतोषा व भांगडी डोंगर अवैधरित्या उत्खननाबात मंगळवारी (आज) पर्यावरण राज्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्हाधिकार्यांसह सबंधित गावातील सरपंच व इतर पर्यावरण प्रेमी, सदस्य उपस्थीत राहणार आहेत.
दोषींवर कारवाई
गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी डोंगर अवैधरीत्या उत्खनन केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी दोषी खाणमाफियाला दीड कोटीचा दंड आकारण्यात आला. तसेच संबंधित दोषी अधिकार्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर ब्रह्मगिरी पर्वत रांगातील बेलगाव ढगा येथील संतोषा व भांगडी हे जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील असलेले डोंगर खाण माफियांकडून पोखरण्याचे काम सुरु असल्याचे समोर आले होते. त्यावर पर्यावरण प्रेमींनी तीव्र आक्षेप घेत थेट पर्यावरण मंत्रालयाशी पत्रव्यवहार करत या मुद्याकडे लक्ष वेधले होते. उशीराने का होईना या प्रकरणाची दखल पर्यावरण मंत्रालयाने घेतली आहे. यासंपूर्ण प्रकरणी पर्यावरण राज्यमंत्री संजय बन्सोड यांनी आज मंत्रालयात दुपारी बैठक बोलावली आहे. बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपवनसंरक्षक, जिल्हा खनिजकर्म अधिकारी उपस्थित राहणार आहे. तसेच बेळगावढगा ग्रामपंचायतीचे सरपंच व पर्यावरण प्रेमी देखील उपस्थित राहणार आहे. याबैठकीत नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा - कोरोना काळात 14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? - भाजप नेते बावनकुळे