नाशिक - पुण्यातील कार्यक्रमात अजित पवार व देवेंद्र फडणवीस शेजारी शेजारी बसले म्हणजे लगेच सरकार बनवतील असा विषय नसतो. राजकीय भूकंप होणार नाही. सरकार पाडण्याचा या ना त्या मार्गाने कोणी कितीही प्रयत्न केला तरी पाच वर्ष सरकार टिकेल. विरोधी पक्षाने सरकार पाडण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ दिला तर ते कदाचित सत्तेत येऊ शकतात, असा टोला उर्जा, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लगावला आहे. ते पिंपळगावमध्ये बोलत होते.
'मागील सरकारच्या भोंगळ कारभारामुळे विज बिल भरणे सक्तीचे'
सध्या सुरू असलेल्या ईडीच्या कारवायांवर त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. ईडीबाबत मी काही वेगळे सांगण्याची गरज नाही, सध्या कसे चालू आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, असे सांगत ईडी विषयावर बोलणे त्यांनी टाळले. विजबिलांवर बोलताना या संकटाला त्यांनी भाजपाला जबाबदार धरले. शासनाने महावितरणला सहकार्य करणे, पैसे देणे अपेक्षित होते ते झाले नाही. ३० हजार कोटी कर्जाचा बोजा हा शेतीपंपाचा वाढला गेला. कोरोनामुळेही परिस्थिती बरी नाही. केंद्र सरकारमुळे मागच्या सरकारच्या भोंगळ कारभारामुळे विज बिल भरणे सक्ती करण्याची वेळ आली. कंपनीचे अस्तित्व टिकवण्यासाठी सक्ती करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
'केंद्राकडून कोळसा देताना दुजाभाव'
लोडशेडिंग होऊ नये, यासाठी तारेवरची कसरत केली. भविष्यात देखिल आपण हे संकट येणार नाही, याची काळजी घेऊ. कोळशाच्या खाणी या केंद्र सरकारच्या मालकीच्या असतात. त्यांच्याकडून कोळसा आपल्याला मिळतो. दुर्दैवाने आपण हे बॅलन्स करण्याचे काम करतोय. केंद्र सरकार कोळसा पुरवण्यात कमी पडले. माझी कोणासमोरही चर्चेसाठी तयारी आहे. राज्याने या विषयाला खूप कौशल्याने हाताळल म्हणून लोडशेडिंग नाही, असा दावाही प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.