नाशिक - गुजरातला जाणार पाणी जर आडवले तर नाशिकसह महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न सुटेल. 111 टीएमसी पाणी नाशिकवरून मराठवाड्याला दिले होते. केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्या राज्यात पाऊस पडतो त्याच राज्याचा त्या पाण्यावर अधिकार आहे. याच नियामाला धरून गुजरातला जाणारे पाणी अडवायला पाहिजे, असे म्हणत अन्न नागरी सुरक्षा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत जयंत पाटील यांच्यासोबर बैठक घेणार असल्याचे सांगितले.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये भुजबळांनी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेत असताना अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. मात्र, बैठक आटोपल्यानंतर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पाच वर्षांत कामे केली असती तर ही वेळ आलीच नसती
सध्या औरंगाबाद विभागाच्या पाण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे या औरंगाबाद येथे उपोषण करत आहेत. याबाबत मंत्री भुजबळ यांना विचारले असता, मागील सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविली होती. जर पाच वर्षांपूर्वी त्यांनी प्रामाणिकपणे कामे केली असती तर आज ही वेळ आलीच नसती, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
हेही वाचा - अंत पाहू नका..! अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, कांदा उत्पादकांचा इशारा