नाशिक : गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात भिडे यांच्या वक्तव्यावरून नवा वाद रंगला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल संभाजी भिडे यांनी अतिशय गलिच्छ वक्तव्य केले.आता त्यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल देखील वक्तव्य केले आहे. भिडेंवर तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाका, अशी संतप्त मागणी राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
भिडे यांच्या मागे बोलवता धनी कोण : संभाजी भिडेंच्या बेतालपणाचा त्यांनी खरपूर समाचार घेतला. भिडे यांच्या मागे बोलवता धनी कोण आहे याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. इतिहास बदलता येईल का, त्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्या पंतप्रधान पुण्यामध्ये येत आहेत. त्यांच्या कानावर देखील या गोष्टी घातल्या पाहिजेत. भिडे हे १५ ऑगस्ट देखील मानायला तयार नाहीत. बाकीच्या लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून अटक करता. मग भिडेंना देखील अटक करून जेलमध्ये ठेवा अशी मागणी त्यांनी केली.
बावनकुळे कधीपासून पंडित झालेत मला माहीत नाही : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार भाजपचा प्रचार करतील असे विधान केले होते. त्यावर बोलताना अजित पवार राष्ट्रवादीचे नेते आहेत. ते फक्त राष्ट्रवादीचा प्रचार करतील. बावकुळे कधीपासून पंडित झालेत मला माहीत नाही, असा टोला त्यांनी लगावला. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार जपानी बाहुलीसारखे असून कोणाला डोळा मारतात कळत नाही असा टोमणा त्यांनी मारला होता. त्यावर बोलताना नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका का केली मला माहीत नाही. पण अशी टीका करून मैत्रीत दुरावा निर्माण करू नये असे मत त्यांनी व्यक्त केले.
'या' समितीवर शरद पवार आहेत : नाशिक शहरात देखील रस्त्यांमध्ये खड्डे पडले आहेत. नवीन आयुक्त आले आहेत, नवीन तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजवली पाहिजेत. लोकमान्य टिळक पुरस्कार समितीवर शरद पवार हे देखील आहेत. त्यामुळे कदाचित ते जात असतील, पण तिथे जायचे का नाही ते पवार ठरवतील असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.
हेही वाचा -