नाशिक - ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकले पाहिजे यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे प्रयत्नशील आहेत. ओबीसी आरक्षणासाठी कोणाच्याही पाया पडायला तयार असल्याचे ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यानी सांगितले आहे.
ओबीसी आरक्षण प्रश्नी भुजबळ यांनी गुरुवारी (दि. 15 जुलै) मुंबईत विरोधी पक्षनेते फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते नाशिक आल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. राजकारण वेगळे ठेवून ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचा आवाहनही छगन भुजबळ यांनी केले आहे.
इम्पेरीकल डेटा संदर्भात जाणार सर्वोच्च न्यायालयात
रॅण्डम सॅम्पलिंग मुद्यासंदर्भात मतभेद असून याबाबत चर्चा झाली आहे. आमचे राजकारण वेगळे असले तरी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वांनी एकत्र यावे. आरक्षणाबाबत सामूहिक नेतृत्व करण्याची तयारी असून तोडगा निघणे महत्वाचा आहे. येत्या दोन-तीन दिवसांत इम्पेरीकल डेटा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे भुजबळांनी सांगितले आहे.
बारामतीवरुन पटोलेंना टोला
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारामतीकरांवर केलेल्या टिकेला उत्तर देत बारामती नेहमी तुमच्या बरोबर राहिलेली आहे. बारामतीनेच आरक्षण दिले. व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यावर महाराष्ट्राने पहिल्यांदा तो स्वीकारला. प्रत्येक वेळी बारामती-बारामती करू नका. बरोबर असताना वितुष्ट वाढवायचे नाही, असा टोला लगावला आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक