नाशिक - मराठा समाज राज्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरतीला विरोध करू नये. शासन भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवत आहे. आम्हाला नाही तर कुणालाच नाही, ही भूमिका मराठा समाज व संघटनांनी घेऊ नये, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. भरतीमुळे आदिवासी, ओबीसी, दलित घरातील मुलांना रोजगार मिळून त्यांच्या परिवाराचे भले होईल. खुल्या जागांमध्ये देखील मराठा समाजाला संधी आहे. भरती रद्द केल्यास अनेक तरुण उमेदवारांचे वय निघून जाईल. तसेच भरतीच केली नाही तर प्रशासनाचा कारभार कसा चालेल? असे सांगत त्यांनी भरती होऊन द्यावी, असे मत मांडले.
खडसे राष्ट्रवादीत आले तर स्वागत..
चंद्रकांत पाटील म्हणाले खडसेंनी उघड नाराजी व्यक्त न करता बंद खोलीत आमच्या दोन थोबाडित माराव्यात, याबद्दल विचारले असता त्यांनी मारायचे की नाही हे खडसेंनी ठरवावे. ते उत्तर महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. राष्ट्रवादीत आले तर त्यांचे स्वागत असेल असे भुजबळ म्हणाले. पक्ष सोडून जाणाऱ्या आमदारांना आपले सरकार पुन्हा येणार आहे असे भाजप फक्त 'लॉलीपॉप' दाखवत आहे.
हेही वाचा - नाशिक : सप्तशृंगी देवीचा नवरात्रौत्सव रद्द, कोरोनामुळे प्रशासनाचा निर्णय