नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जसा जसा वाढतोय, तशी नागरिकांची चिंतादेखील वाढत आहे. कुठलीही बाहेरील वस्तू घरात आणताना प्रत्येक जण काळजी घेत आहे. अशात आता नाशिकमध्ये एटीएमद्वारे दूध थेट ग्राहकांच्या दारात पोहोचत आहे. या प्रकल्पाला नाशिककरदेखील मोठा प्रतिसाद देत आहेत.
मुंबई पुणे शहराच्या तुलनेत नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असली तरी, नागरिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी अनेकदा नागरिकांना घराबाहेर जावे लागत आहे. अशात बाहेरून आणलेली वस्तू कोरोना संक्रमित तर नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. अशात रोज येणाऱ्या दुधाचादेखील त्यात समावेश आहे. यावर पर्याय म्हणून नाशिकच्या जीवनधारा कंपनीने मिल्क एटीएम व्हॅनची निर्मिती केली आहे. संचारबंदी काळात रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी ही मिल्क एटीएम व्हॅन नागरिकांना घरपोच दुधाची सेवा देत आहे. विशेष म्हणजे मिल्क एटीएममध्ये पैसे टाकल्यावर पाहिजे तेवढे गायीचे किंवा म्हशीचे दूध ग्राहकांन हात न लावता मिळत आहे.
थेट शेतकऱ्यांकडून कंपनी दूध विकत घेत असल्याने बाजार भावापेक्षा कमी किंमतीत ग्राहकांना दूध उपलब्ध होत असल्याने ग्राहकांनीही समाधान व्यक्त केले आहे. सध्या नाशकात जीवनधारा कंपनीच्या दोन मिल्क एटीएम व्हॅन सेवा देत असून, रोज साधारण 800 ते 1000 लिटर दूधविक्री होत असल्याचे हरीश जैन यांनी सांगितले.