नाशिक MD Drugs Seized : नाशिक अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकानं सोलापुरातील एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. यादरम्यान कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत आठ जणांना पोलिसांनी अटक केली.
आठ जणांना अटक : नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 7 ऑक्टोबर रोजी नाशिकरोड परिसरात गणेश शर्मा या अमली पदार्थ तस्कराला अटक केली होती. त्याच्याकडून 12.5 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केलं होतं. त्यानं गोविंद साबळे, आतिश चौधरी या दोघांकडून एमडी ड्रग्ज खरेदी केल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर ड्रग्ज खरेदी-विक्रीचं मोठं जाळं निर्माण करणारे नाशिकरोड परिसरातील आरोपी सनी पगारे, अर्जुन पिवाल, मनोज गांगुर्डे, सुमित पगारे यांनाही अटक करण्यात आली होती.
सोलापुरातील एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त : याप्रकरणातील मुख्य आरोपी सनी पगारे याच्या चौकशीमध्ये त्यानं सोलापूर येथे स्वामी समर्थ नावानं केमिकल फॅक्टरी उघडली होती. त्यामध्ये तो एमडी ड्रग्जची निर्मिती करत असल्याचं समोर आलं. यानंतर नाशिक पोलिसांनी सोलापूर येथे जाऊन या कारखान्यावर छापा टाकला. त्यात सुमारे 9 किलो 600 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जसह कच्चा माल, साहित्य असा सुमारे 10 कोटी रुपयांचा साठा जप्त केला आहे.
करोडो रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त : पोलिसांनी या संशयित आरोपींची कसून चौकशी केली असता, मनोज भरत गांगुर्डे याच्याकडून 1 किलो 27 ग्रॅम, सनी पगारे याच्याकडून 2 किलो 63 ग्रॅम, अर्जुनेश सुमवाल याच्याकडून 58 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अधिक तपास केला असता आरोपीनं त्याच्या साथीदाराच्या संगनमतानं हे अंमली पदार्थ खरेदी केल्याचं समोर आलंय.
राज्यभर छापे टाकण्यास सुरुवात : नाशिकमधून ड्रग्जचं मोठं रॅकेट उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी राज्यभर छापे टाकण्यास सुरुवात केली. आरोपी ललित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी आता सुरू झाली आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील हा 2 ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्यावेळी त्याने मी पळालो नसून मला पळवण्यात आल्याचा आरोप केला होता. मात्र, यामागं पोलिसांचा हलगर्जीपणा हेही एक प्रमुख कारण होतं. याप्रकरणी कर्तव्यात हलगर्जीपणा, केल्याबद्दल पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी आणखी एका महिला अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता हनुमंत भागवत असं निलंबित महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. यापूर्वी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एका महिला पोलीस उपनिरीक्षकासह नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं.
हेही वाचा -
- MD drugs seized : सोलापूरला पुन्हा ड्रग्जचा अड्डा ; ड्रग्ज डीलर छोटूच्या उत्तरप्रदेशातून आवळल्या मुसक्या, एक कोटींचं एमडी ड्रग्स जप्त
- मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई, डोंगरी परिसरातून 50 कोटींचे ड्रग्स जप्त तर महिलेसह तिघांना अटक
- Action On Drugs : दया नायक यांची धडक कारवाई; ड्रग्जचा कच्चा माल आणि १६ कोटींचे एमडी जप्त, दोघांना अटक