नाशिक - जिल्ह्यातील पिंपळस रामाचे येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील छोट्याशा मंदिरात आपल्या लेकीचे लग्न लावले. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत केलेल्या या लग्नसंभारंभाची नाशिक जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. वर्षानुवर्षे काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने या संकट काळात आपल्या काळ्या मातीतच मुलीचा विवाह केला आहे.
अवघ्या काही दिवसांवर लग्न येऊन ठेपल्याने अनेक वधू-वरांनी भावी आयुष्याची स्वप्न बघत तयारीसुद्धा केली होती. मात्र कोरोनाने देशभरासह महाराष्ट्रात थैमान घालण्यास सुरुवात केली आणि या भावी दाम्पत्याच्या थाटामाटात लग्न करण्याच्या स्वप्नांवर विरजण पडले. मात्र, नाशिकमधील कैलास शिंदे आणि सिन्नर येथील रावसाहेब पवार यांनी शेतातील मंदिरात साधेपणाने आपल्या मुलांचे लग्न लावले. निखिल आणि सायली असे या नवदाम्पत्याचे नाव आहे.
कोणताही थाटमाट न करता, संचारबंदीच्या सर्व नियमांचे पालन करत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न झाला. निफाडच्या तहसीलदारांच्या नजरेत ही गोष्ट येताच त्यांनीदेखील याठिकाणी हजर होत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. सोबतच कैलास शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण सर्वांनी करण्याचे आवाहन केले.