नाशिक - मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी राज्यभर मागणी करण्यात येत आहे. आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निवेदन देण्यात येणार होते. मात्र, भुजबळ निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्याने संतप्त झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांच्या घराबाहेर निवेदन चिकटवून भुजबळ फार्म परिसरात गोंधळ घातला.
पालकमंत्री भुजबळ यांनी आपला हेतुपूर्वक अपमान केला असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी केला आहे. पालकमंत्र्यांना मराठा समाजाची गरज नसेल तर, आम्हालाही अशा पालकमंत्र्यांची गरज नाही, असे आंदोलकांनी म्हटले.
मराठा आंदोलकांनी गोंधळ घातल्याचे समजताच काही वेळातच भुजबळांनी आपल्या निवासस्थानी दाखल होऊन आपला मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. नियोजित कार्यक्रमांची कल्पना देऊन सुद्धा काही लोक राजकारणाच्या हेतूने गोंधळ घालत असल्याचे भुजबळांनी सांगितले.