मनमाड - गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मनमाड शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेली करंजवन पाणी पुरवठा योजनेला २४० कोटी रुपये किमतीच्या अंदाजपत्रके व आराखड्यास तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा मनमाड शहरातील जनतेला फायदा होणार असुन थेट पाईपलाईन द्वारे मनमाड शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
मनमाडकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार -
मनमाडला भीषण पाणी टंचाई असल्यामुळे मनमाड शहरवासियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे पाणी प्रश्न सुटण्यासाठी मनमाडकरांनी देव पाण्यात ठेवले होते. मनमाडची तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता मनमाडचा पाणी प्रश्न सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे आश्वासन आमदार सुहास कांदे यांनी निवडणुकी दरम्यान दिले होते. त्यामुळे आमदारांनी कोरोना प्रादुर्भाव कालावधीत देखील या योजनेच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठ पुरावा केला. मनमाड पाणी पुरवठा योजना मंजुरीसाठी मागील वर्षाी ४ मे रोजीचा महाराष्ट्र शासन, वित्त विभागाचा शासन निर्णय, पाणी पुरवठा योजनेच्या समितीवर लोकप्रतिनिधींची नेमणूक नसणे यामुळे अडचणी येत होत्या. त्यामुळे आमदार सुहास कांदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून मागील वर्षी ४ मेच्या शासन निर्णयतून या योजनेला खासबाब म्हणुन सूट मिळवून घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून करंजवन योजना समितीवर लोकप्रतिनिधी म्हणुन नेमणुक व्हावी यासाठी विंनती केल्यामुळे समितीवर आमदारांची नेमणुक करण्यात आली. यामुळे करंजवन योजनेच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र शासन वित्त विभागाने अंदाजपत्रके व आराखड्यांची तपासणी करून तपासणी अंती रुपये २४० कोटी इतक्या किमतीस तांत्रिक मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. मनमाड शहराचा वर्षानुवर्षांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्यामुळे जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
लवकरच कामाला सुरूवात -
गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड शहराचा पाणीप्रश्न प्रलंबित आहे. यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले शासनाने कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी योजना मागविण्यात आली होती. त्यासाठी मनमाड करंजवन योजनेचा प्रस्ताव तयार करून देण्यात आला आता ही योजना अंतिम टप्प्यात असुन त्यास तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. लवकरच टेंडर होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यात येईल. या योजनेमुळे आगामी काळात मनमाड शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल असे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.