नाशिक - केवळ ७०० रुपयांसाठी मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. सिन्नर तालुक्यातील मोहदरी घाटात 19 जुलैला एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह बघितला असता, डोक्यात काही तरी मारून वर्मी घाव बसल्यानेच हा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. त्यामुळे हा खुनाच प्रकार असल्याचा अंदाज स्थानिक गुन्हे शाखेला होता.
पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाची चक्र फिरवत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मृत झालेल्या अशोकचा मित्र संदीप सोनवणेला चौकशीसाठी ताब्यात घेतल असता, उडवाउडवीची उत्तर मिळाल्यामुळे पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सिन्नर तालुक्यातील मोहदरी घाट परिसरातील वन उद्यानाजवळ १९ जुलैला एक मृतदेह आढळून आला होता. डोक्यास मार असल्याने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो मृतदेह अशोक बारकु महाजन (वय-३८, रा. श्रमिकनगर, सातपूर) यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरुवात केली. त्यानुसार अशोकचा मित्र संदीप सोनवणे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशीत त्याने अशोक यांचा खून केल्याची कबुली दिली.अशोक महाजन आणि संदीप यांच्यात एक ते दीड वर्षांपासून मैत्री होती. काही दिवसांपूर्वीच अशोक यांनी संदीपकडून ७०० रुपये उसने घेतले होते. औद्योगिक वसाहतीतून एकाकडून १८ हजार रुपये घेऊन दोघेही दुचाकीवरून नाशिकला येण्यासाठी निघाले. मोहदरी घाटात संदीपने अशोककडे उसने दिलेले ७०० रुपये मागितले. मात्र अशोक यांनी पैसे नंतर देतो, असे सांगितल्याने त्यांच्यात वाद झाला. ''१८ हजार रुपये असतानाही ७०० रुपये का देत नाही'' यावरून वाद सुरू असताना संदीपने एक दगड उचलून अशोकच्या डोक्यात टाकला. त्यातच अशोकचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
संदीपने अशोककडील १८ हजार रुपयांची रोकड घेऊन नाशिक गाठले. पोलिसांनी संदीप यास अटक केली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहायक निरीक्षक अनिल वाघ, सहायक उपनिरीक्षक प्रभाकर पवार, हवालदार प्रकाश चव्हाणके, नाइक प्रितम लोखंडे, हेमंत गिलबिले, शिपाई निलेश कातकाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.