नाशिक - कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या स्ट्रेनचा धोका बघता जिल्हाप्रशासनाने एक आठवड्यापुर्वी माॅल सुरु करण्यास दिलेली परवानगी रद्द केली आहे. सोमवारपासून शहरासह जिल्ह्यातील माॅल बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाने दिले आहेत.
एक आठवड्यातच माॅल पुन्हा बंद
केंद्र सरकारने करोनाची तिसरी लाट व डेल्टा प्लस या नव्या स्ट्रेनचे संक्रमण बघता महाराष्ट्र सरकारला सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व जिल्ह्याना तिसर्या टप्प्यातील निर्बंध जारी केले आहेत. नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या व पाॅझिटिव्हिटी रेट घटला तरी खबरदारी म्हणून जिल्हाप्रशासनाने जिल्ह्यास तिसर्या टप्प्यातच ठेवत शनिवारी- रविवार लाॅकडाऊन कायम ठेवला होता. त्यामध्ये अटीशर्ती लागू करत थोडीफार शिथीलता माॅलचालकांसाठी दिली होती. पन्नास टक्के क्षमतेने माॅल सुरु करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयामुळे माॅल चालकांस मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, डेल्टा प्लसच्या धोक्यामुळे एक आठवड्यातच माॅल पुन्हा बंद करण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाला घ्यावा लागला आहे. यामुळे माॅलचालकांमध्ये नाराजी असून अर्थचक्रही मंदवण्याची शक्यता आहे. मॉल बरोबरच शनिवार-रविवार लॉन्स धारकांना अटी शर्तीवर लग्नसमारंभासाठी सवलत दिली होती. ती देखील आता रद्द करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत २ हजार ४९० रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार १०५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहेत. सद्यस्थितीत २ हजार ४९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ७४ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ८ हजार २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.