नाशिक - जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि पुरवठा विभागाने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्वस्त धान्य दुकानांसाठी २५ हजार टन मका आणि ज्वारी (दादर) खरेदीची घोषणा करून एक महिना उलटला आहे. तरीही अद्याप पाहिजे त्या प्रमाणात सटाणा, देवळा, कळवण तालुक्यातून मका खरेदी केली जात नसल्याचे निर्दशनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सटाणा येथे दक्षिण सोसायटीमार्फत आठ दहा दिवसांपूर्वी मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, आत्तापर्यंत फक्त सरासरी ४०० ते ५०० क्किंटल मक्याची खरेदी झाल्याची माहिती समोर आली आहे. मका खरेदीसाठी अन्न आणि पुरवठा विभागाकडुन बारदाण उपलब्ध होत नसल्याने मका खरेदी संथगतीने सुरू असल्याचे दक्षिण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आत्तापर्यंत १० हजार क्विंटल मक्याची ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर कळवण, देवळा, बागलाण तालुक्यात हजारो क्विंटल मका शेतकऱ्यांकडे शिल्लक असतांना अशा संथगतीने मका खरेदी चालू राहिल्यास महिना दोन महिन्यात ही खरेदी संपणार नाही, अशी तक्रार केली जात आहे. या संदर्भात बागलाणचे नायब तहसीलदार जे.बी. बहीरम यांना शेतकऱ्यांकडून निवेदन देण्यात आले आहे. यावेळी बाजार समितीचे मा. सभापती भिकानाना सोनवणे, पांडुनाना सोनवणे, कुबेर जाधव, सुभाष पवार, नामदेव नंदाळे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
मका खरेदीसाठी शासनाच्या पुरवठा विभागाने तातडीने हवे तितके बारदाण उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. मात्र शासकीय काम आणि महिनाभर थांब, हेच यातून सिद्ध होते. शासनाने त्वरित हस्तक्षेप करून बारदान उपलब्ध करून घ्यावेत व मका उत्पादक शेतकंऱ्याना दिलासा द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव यांनी केली आहे.