नाशिक - महाविकास आघाडीत काँग्रेसच्या खात्यावर निधी वाटपात अन्याय होत असल्याची खंत महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज व्यक्त केली. याबाबत आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. याचबरोबर त्यांनी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याबद्दल बावनकुळे यांनी बोलण्याचा काय संबंध? बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजीत केला होता. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
बाळासाहेब थोरात यांनी केंद्रातील भाजपसरकारवर टीका केली. देशात समता व घटनेच्या मूलतत्वाला छेद देण्याचे काम सुरू आहे. तसेच काश्मीरमधील गुपकरमध्ये काँग्रेस सहभागी नाही. पीडीपी पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने युती केली होती. मात्र, भाजप नेते इतरांवर आरोप करत आहेत. हा दुटप्पीपणा आहे, असे थोरात म्हणाले. याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस सूडबुद्धीने देण्यात आली का ? याबद्दल माहिती नाही, असं थोरात यांनी नमूद केलं.
बावनकुळे यांच्याकडून काड्या लावण्याचा प्रयत्न -
लॉकडाऊनकाळात आलेल्या वीजबिल तक्रारी उर्जामंत्र्यांनी सोडविल्या आहेत. नितीन राऊत यांच्याबद्दल बावनकुळे यांनी बोलण्याचा काय संबंध? बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच सरकार आर्थिक अडचणीत असून, दर महिन्याला 12 हजार कोटींचे कर्ज काढावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेची निवडणूक -
आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवू शकतात. यासंदर्भात लवकरच एकत्र बैठक घेऊ. त्यामुळे साहजिकच आमच्या जागा वाढणार, असा दावा थोरातांनी केला.
हेही वाचा - उत्तराखंड निवासस्थान घरभाडे प्रकरण : राज्यपाल कोश्यारींची सर्वोच्च न्यायालयात धाव