नाशिक - देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडणारी उटीची वारी यंदा मात्र अवघ्या तीन पुजाऱ्याच्यां उपस्थितीत पार पडली. दरवर्षी चैत्र वैद्य एकादशीला ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीला चंदनाचा लेप लावला जातो.
निवृत्तीनाथांना वैशाख वणवा सुसह्य व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव पार पडत असतो.यंदा मात्र कोरोनाचं संकट असल्याने निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात सोशल डिस्टन्सिंग पाळत अवघ्या तीन पुजाऱ्यांनी निवृत्तीनाथांचा समाधीला चंदनाचा लेप देत पूजा पार पाडली. तसेच यावेळी देशावरील कोरोनाचं संकट लवकर दूर होऊ दे, अशी प्रार्थनाही या पूजाऱ्यांनी नाथांच्या चरणी केली.
वारकरी संप्रदायाचे आद्य दैवत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवनी समाधीला चंदनाचा लेप लागल्याने महाराजांची संजीवनी समाधी अधिकच आकर्षक दिसत होती
दरवर्षी संत ज्ञानेश्वरांचे गुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातील हजारो भाविक या उटीच्या वारीला हजेरी लावत असतात. मात्र यंदाच्या वर्षी जगावर कोरोणाचा सावट असल्याने उटीची वारी रद्द करण्यात आली. त्यामुळे दरवर्षी हजारोंच्या संख्येने गजबजून निघणारी त्र्यंबक नगरी ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. मंदिर परिसरात जमावबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगच उल्लंघन होऊ नये, यासाठी जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक भिमाशंकर ढोले आणि त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे आदी सह पोलिस कर्मचारी उपस्थितीत होते.