नाशिक - मनमाड शहरातील वाढती रुग्ण संख्या, तसेच व्यापारी आणि महिला वर्गाचा विरोध झुगारून आजपासून मनमाड शहरात मद्यविक्री सुरू करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सकाळी 10 ते 4 या वेळेत ही मद्यविक्री सुरू राहणार आहे. शासनाने दिलेले सर्व नियम पाळत ही विक्री सुरू करण्यात आली. सकाळपासूनच रांगेत उभा असलेल्या तळीरामांना तब्बल दोन महिन्यानंतर आज मनसोक्त मद्याचा आंनद घेता येणार आहे.
मनमाड हे रेल्वेचे मोठे जंक्शन असून येथे मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग राहतो. या ठिकाणी जवळपास 8 देशी दारू दुकाने, 3 वाईन शॉप, 11 बियर शॉपी आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ही सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे, शहरातील तळीरामांची मोठी अडचण होत होती. मात्र, तरीही छुप्या मार्गाने चढ्या भावात मद्यविक्री सुरूच होती. असे असतानादेखील आज सकाळी मद्यविक्रीच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार एकीकडे शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना रेड झोन व कंटेंनमेंट झोनच्या नावाखाली दुकाने बंदच ठेवायला सांगितली. तर दुसरीकडे मद्यविक्रीसाठी परवानगी दिल्याने नागरिकांसह व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. शहरात अनेक छोटे मोठे कापड व्यापारी आणि हातावर पोट असणारे अनेक व्यवसायिक आहेत. मात्र, त्यांना फिजिकल डिस्टन्सच्या नावाखाली परवानगी नाकारण्यात आली आहे.
निवेदन दोघांचे विचार फक्त मद्याचा !
मनमाड शहरातील दूध विक्रेत्यांना दिली गेलेली वेळ ही अत्यंत तोकडी असून ही वेळ वाढवावी यासाठी दूध विक्रेते संघाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच निवेदन मद्यविक्रीसाठीदेखील देण्यात आले. मात्र, मद्यविक्रीसाठी आलेल्या निवेदनाचा विचार करत त्यांना परवानगी देण्यात आली. तर, दूध विक्रीसाठी आहे तीच वेळ ठेवण्यात आली. यामुळे, नाराजीचे सूर उमटत आहेत.