नाशिक - काही दिवसांपूर्वी त्रंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष याठिकाणी जवळपास 17 क्विंटल गहू आणि तांदळाचा काळाबाजार सुरू असल्याचे समोर आले. यानंतर अखेर संबंधित रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोरोना काळात गोरगरीब नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागू नये, यासाठी राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीने रेशनमार्फत धान्य उपलब्ध करून देण्यात येते. मात्र याच धान्याचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार 5 नोव्हेंबरला श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला होता. 5 नोव्हेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष याठिकाणी असलेल्या महालक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका डहाळे यांच्या रेशन दुकानातून जवळपास 16 क्विंटल गहू आणि तांदूळ इतरत्र विक्रीसाठी नेण्यात येत होते.
यावेळी श्रमजीवी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी हा ट्रक पकडून घोटी पोलिसांच्या स्वाधीन केला. दरम्यान याची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश काढले होते. याच अनुषंगाने या रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तू कायद्याचा भंग केल्याप्रकरणी बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका डहाळे तसेच धान्य वितरक शिवराम डहाळे आणि ट्रक चालक संजय कडलग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुरवठा विभागाच्या या कारवाईमुळे रेशनचा काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकान चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.