नाशिक: बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. याआधीही भरवस्तीत बिबट्या किंवा रानटी प्राणी घुसून ग्रामस्थांना त्रास देण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. अशात या बिबट्यांना कुठल्या प्रकारची इजा न करता त्यांना रेस्क्यू करून त्यांच्या अधिवासात पाठवण्याचे काम वन विभाग करते. याच वन विभागात काम करणारे अधिकारी म्हणून सुनील वाडेकर यांची ओळख आहे. वाडेकर यांनी 20 वर्षाच्या सेवेत मानवी वस्तीत आलेल्या 150 हुन अधिक बिबट्यांना सुरक्षित रेस्क्यू करून त्यांच्या अधिवासात सोडले आहे. त्यामुळे ते लेपर्ड मॅन म्हणून सर्वत्र परिचित आहे.
लेपर्ड मॅन म्हणून परिचित: नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबद, ठाणे, पुणे, नांदेड, सातारा, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यात मानवी वस्तीत शिरलेल्या सुमारे दीडशेहून अधिक बिबट्यांना रेस्क्यू करून प्राण वाचवले आहे. म्हणून ते सर्वत्र त्यांना लेपर्ड मॅन म्हणून परिचित आहे. 24 वर्षांपूर्वी वन्यजीवांसाठी काम करण्याच्या तळमळीने त्यांनी रेल्वेमधील नोकरी सोडून, वनविभागात प्रवेश मिळविला. मानव-बिबट्या संघर्षाच्या घटनांवर मात करणे यात त्यांचा मोठा हातखंडा आहे. जीवाची बाजी लावून बिबट्या बचावाचे काम ते आजही करत आहे.
हॉटेलमध्ये बिबट्या: 2004 मध्ये शहरात प्रथमच बिबट्या शिरल्याचा प्रसंग घडला. त्यापूर्वी शहराच्या भरवस्तीत बिबट्या शिरल्याची घटना कधीही घडली नव्हती. मुंबई नाका परिसरातील रसोई हॉटेलमध्ये बिबट्या लपल्याची माहिती वाडेकर यांना मिळाली. मात्र त्यावेळी नाशिकमध्ये बिबट्याला बेशुद्ध करण्याची यंत्रणा उपलब्ध नव्हती. म्हणून मुंबईहून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. त्या पथकाला नाशिकमध्ये दाखल होण्यास पाच तास लागणार होते. मात्र तो पर्यंत बिबट्याने धुमाकूळ घालत चार ते पाच जणांना जखमी केले होते. हाताबाहेर जाणारी परिस्थिती पाहून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिबट्याला बंदुकीच्या गोळीने ठार करण्याचे आदेश दिले.
बिबट्या बचावाचे प्रशिक्षण: पोलिसांच्या मदतीने बिबट्याला ठार करण्यात आले. ती घटना वाडेकर यांच्या मनावर आघात करून गेली. या नंतर वन विभागाने त्यांच्यासह नाशिकच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईच्या बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये बिबट्या बचावाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर नाशिक आणि त्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात घडणाऱ्या बिबट्या बचावाचे काम सुनील वाडेकर करू लागले. वीस वर्षाच्या सेवेत त्यांनी आत्तापर्यंत 150 हून अधिक म्हणून अधिक बिबट्यांना रेस्क्यू करत जीवदान दिले.
तो प्रसंग कठीण होता: वीस वर्षाच्या माझ्या कार्यकाळात मी जवळपास 150 हून अधिक बिबट्यांना रेस्क्यू केले आहे. या काळात अनेक प्राणघातक हल्ल्यांना देखील मला सामोरे जावे लागले. पण अशा वेळेस स्वतःचा बचाव करून बिबट्याला कशा पद्धतीने रेस्क्यू करता येईल, त्याचा जीव वाचवता येईल हा माझा पहिला प्रयत्न राहिला.अशात वणी येथील मैदाने गावामध्ये 12 एप्रिल 2012 मध्ये बिबट्या आला होता. त्यादिवशी बिबट्याने माझ्यावर हल्ला केला होता. या घटनेमध्ये पडल्यामुळे जखमी देखील झालो होतो, तरी अशा परिस्थितीमध्ये मी बिबट्याला सुरक्षित वाचवले होते. गेल्या 20 वनसेवेत मी एकदाही मागे वळून पाहिले नाही. बिबट्या बचावाचे काम सुरू ठेवले आहे. तसेच आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रसह, उत्तराखंड, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यातील वनकर्मचाऱ्यांनाही बिबट्या बचावाचे प्रशिक्षण दिले आहे, असे लेपर्ड मॅन सुनील वाडेकर यांनी सांगितले.
हेही वाचा -