नाशिक - कोंबड्यांचा फडशा पाडून धूम ठोकण्याच्या प्रयत्नात असलेला बिबट्या विहिरीत पडला होता. विहिरीतील पाण्यात गटांगळ्या खाण्याची वेळ बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे बिबट्यावर आली. वेळीच ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने बिबट्याचे प्राण वाचविण्यात यश आले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मदतीने विहिरीत खाट टाकून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याची सुटका करण्यात यश आले.
तरसाळी येथील शेतकरी गोपा पांडुरंग रौंदळ यांच्या खुरड्यातील कोंबड्यांवर ताव मारून पळण्याच्या बेतात असलेला बिबट्या शेतातील विहिरीत पडल्याचे बिबट्याच्या डरकाळींवरून लक्षात आले. रौंदळ यांनी तत्काळ वन विभागाचे अधिकारी रमेश साठे यांना माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने विहिरीत खाट टाकून बिबट्यास वर काढले. खाटेवर बसलेल्या बिबट्याने विहिरीच्या काठावर येताच उडी मारून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
बिबट्याने रौंदळ यांच्या तीन कोंबड्यांचा फडशा पाडल्याने वन विभागाने पंचनामा केला आहे. बिबट्यास सुरिक्षत ठिकाणी हलविण्यासाठी वन विभागाने तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये कांद्याने गाठली शंभरी; दलाल आणि किरकोळ विक्रेत्याकडून ग्राहकांची लूट