नाशिक - जिल्ह्यातील हिंगणवेढे येथे आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास १२ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये तो जागीच ठार झाला. मित्रांसोबत पळण्यासाठी (रनिंग) गेला असताना ही घटना घडली.
कुमार योगेश पागरे, असे मृत मुलाचे नाव आहे. तो आज सकाळी आपल्या मित्रांसोबत पळण्यासाठी गेला होता. यावेळी बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी वनविभाग आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी आणि वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर अंत्यत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बिबट्यामुळे हिंगणवेढे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून गेल्या अनेक दिवसांपासून तीन ते चार बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.