नाशिक - आपल्या देशाची संस्कृती ही कुटुंब वत्सल असल्याने कुटुंबासाठी आपले जीवन सुरक्षित असणे, ही आपली प्राथमिकता आहे. त्यासाठी कोणतेही वाहन चालवितांना आपण सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या अनुषंगानेच आज (रविवारी) जिल्ह्यात 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' ही मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. 'सर सलामत तो हेल्मेट पचास' यानुसार स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरीकांनी हेल्मेट वापरून या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
गेल्या 5 वर्षात इतक्या नागरिकांचा मृत्यू
आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सदभावना पोलीस पेट्रोल पंप, गंगापूर रोड येथे मंत्री भुजबळ यांच्या हस्ते 'नो हेल्मेट नो पेट्रोल' मोहिम शुभारंभ कार्यक्रम पार पडला. गेल्या पाच वर्षात शहरात ७८२ अपघातात ८२५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघाती मृतांमध्ये ४६७ हे दुचाकीस्वार असून त्यापैकी ३९७ जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे समोर आले आहे. अशा अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा हा उपक्रम स्तुत्य असून, कोणत्याही परिस्थितीत नागरीकांचा जीव वाचविणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. नागरीकांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास खऱ्या अर्थाने जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या विकासात हातभार लावला जाईल, अशी भावना भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
...तर होणार कारवाई
हेल्मेट न घातल्याने होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेवून, सर्व पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे लावून हेल्मेट न घालणाऱ्या बेशिस्त नागरीकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, अशा सुचना देखील यावेळी भुजबळ यांनी दिल्या आहेत. ही मोहिम यशस्वीपणे राबवून देशात आदर्श निर्माण करू असेही यावेळी भुजबळ म्हणाले. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे प्रत्येक पेट्रोल पंपावर माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पेट्रोल पंप व शहर पोलीस यांच्या संमतीने पेट्रोल पंपावर हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनाच पेट्रोल देण्याचे प्राधन्य देण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वीपणे राबवून देशात आदर्श निर्माण करू, असा विश्वास पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय यांनी व्यक्त केला आहे. या मोहिमेसाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 2 हजार 53 हेल्मेट उपलब्ध करण्यात आले असून, पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते उपस्थित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमाची आमदार सरोज अहिरे व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी हेल्मेट घालुन भुजबळ यांच्या हस्ते आपल्या गाडीत पेट्रोल भरून सुरूवात केली आहे.
हेही वाचा -स्वातंत्र्यदिनी राज्यात मंत्रालयासह तीन ठिकाणी शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न-