नाशिक Lathicharge On Maratha Protestor : जालना जिल्ह्यातील अंतरवली इथं मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर निदर्शनं करण्यात येत आहेत. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीहल्ल्याचा नाशिक शहरासह जिल्ह्यातील मराठा संघटनांनीही निषेध केलाय. महाविकास आघाडीतर्फे नाशिकरोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घटनेचा निषेध म्हणून टरबूज फोडण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या घटनेला जे जबाबदार असतील त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आंदोलकांनी केलीय.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडलं : नाशिक शहरात संभाजी ब्रिगेडनं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पोस्टर फाडून निषेध केला. तसंच कार्यकर्ते रस्त्यावर टायर जाळण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सरकार विरोधात घोषणाबाजी : निफाड तालुक्यात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं गावागावात घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाला दिलेल्या अमानुष वागणुकीमुळं राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा आंदोलकांच्या वतीनं देण्यात आला. अंबड तालुक्यातील अंतरवली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गानं उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. त्यामुळं या प्रकणाची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी पोलिसांना निलंबित करुन त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे.
लाठीचार्जमध्ये अनेकजण जखमी : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात पोलिसांनी लाठीहल्ला केलाय. शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं राज्यभरात पडसाड उमटत आहेत. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये महिलांसह अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. मनोज जरंगे पाटील मराठा आरक्षणासंदर्भात उपोषणाला बसले होते. १ सप्टेंबर रोजी उपोषणाचा चौथा दिवस होता. त्यामुळं पाटील यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनानं केली होती, मात्र ते उपोषणावर ठाम होते.
हेही वाचा -