नाशिक - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 91व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या थोर व्यक्तिमत्वाचे गौरवगीत प्रथमच संगीत चित्रफीता द्वारे गीतकार, संगीतकार संजय गीते यांनी तर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार राजेश सावंत यांनी अनोखी कलाकृती सादर करत दिदींना शुभेच्छा दिल्या.
गानकोकिळा लता मंगेशकर यांनी हजारो गीतं गायली आहेत. परंतु त्यांच्या महान व्यक्तिमत्वावर आधारित एकही गीत नाही. कोरोना काळात ज्यांचा स्वर हा औषध आणि अमृता समान आहे, असा विचार करून संगीतकार संजय गीते यांनी दुःख-दर्द में दवा दुवा है, ये दुनिया में एकही स्वर लता मंगेशकर या शब्दांत गीत स्वरबद्ध केले आहे. त्यांनी दिल्लीस्थित जेष्ठ हिंदी कवी लक्ष्मीनारायण भाला यांच्याकडून या संकल्पनेवर संपूर्ण गीत लिहून घेतले. तसेच संगीतकार संजय गीते यांनी हे गाणं उत्कृष्ट स्वरबद्ध केलं आहे. सूर सरस्वतीच्या गीत वंदनेचे प्रमुख आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांनी लता मंगेशकर यांच्या चेहऱ्यावरील निखळ हास्य व उत्तुंग व्यक्तिमत्वाला आधारित भावमुद्राचे पेंटिंग देखील साकारले आहे.