नाशिक - अन्न व औषध प्रशासन आणि गुन्हे शाखा युनिट १ यांच्या संयुक्त पथकाला लाखोंचा अवैध गुटखा जप्त करण्यात यश आले आहे. पथकाने पेठरोड परिसरात धडक कारवाई करत एका वाहनातून तब्बल साडे चार लाखांचा अवैध गुटखा जप्त केला. तर शिवशक्तीनगर येथे १ लाख ४४ हजार रुपयांचा अवैध गुटखा पथकाला आढळला.
गुटख्यावर बंदी असतानाही विक्रीसाठी शहरात गुटखा आणला जात होता. मात्र, यासंदर्भातली गुप्त माहिती गुन्हे शाखा पथकाला मिळताच त्यांनी सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. पोलिसांना या वाहनात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा मिळाला. पोलिसांनी गुटख्यासह १० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अन्नऔषध व मानके कायद्यांतर्गत अटक केलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक असलेल्या पदार्थांची विक्री करू नये आणि कोणी प्रतिबंधित असलेल्या पदार्थांची विक्री करत असल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन अन्न औषध विभागाने केले आहे.
अवघ्या काही दिवसांपूर्वीच शिंदे पळसे येथून ४ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. आता त्यात पुन्हा अवैधरित्या विक्री हेतू आणलेला गुटखा जप्त करण्यात आल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा माफियांकडून गुटखा विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे.