नाशिक - देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यावर आलेल्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने सामाजिक भान राखत नाशिकच्या 'लाडशाखीय वाणी मित्र मंडळ' यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 11 लाखांची मदत देण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश मंडळाकडून राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द केला.
हेही वाचा.... ईटीव्ही भारत विशेष : राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय संकटात
लाडशाखीय वाणी मित्रमंडळाच्या सदस्यांनी आज (गुरुवार) नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठाी अकरा लाख रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला. कोरोना सारख्या संकटप्रसंगी सरकारला मदत केल्याबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी लाडशाखीय वाणी मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन बागड, विश्वस्त दीपक बागड, भगवान खैरनार, राजेश कोठावदे सचिव निलेश कोतकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.