नाशिक - जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 1678 गावात असलेल्या 5.76 लाख हेक्टरवर होणार खरीप पिकाची लागवड केली जाणार आहे. तर सर्वाधिक 35 टक्के लागवड ही मका पिकाची होईल. शेतकऱ्यांना बियाणे आणि खताचा तुटवडा जाणवणार नसल्याचे नियोजन कृषी विभागाने केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा कामात जुंपली आहे. दुसरीकडे येणाऱ्या खरीप पिकाबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत, याचे नियोजन केले जात आहे. नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 15.58 लाख असून जिल्ह्यातील 15 तालुक्यात एकूण 1961 इतकी गावे आहेत. त्यापैकी यावर्षी 1678 गावात खरीप पिकाची लागवड केली जाणार आहे. यंदाच्या वर्षी 5.76 लाख हेक्टरवर ही लागवड केली जाणार असून यात सर्वधिक 35 टक्के मकाचे उत्पादन घेतले जाणार आहे. त्या पाठोपाठ बाजरी 16 टक्के, भात 14 टक्के, सोयाबीन 12 टक्के तसेच 45 हजार हेक्टरवर कापसाचे उत्पादन घेतले जाणार आहे.
सोयाबीन बियांणाचा तुटवडा...
यंदा खरीप पिकासाठी 97 हजार 600 क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. आतापर्यंत 60 हजार क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध असून, मागील वर्षी पाऊस उशिरा झाल्याने यंदा सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवणार आहे. यावर्षी 22 हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज असून आतापर्यंत कृषी विभागाने 11 हजार क्विंटल सोयाबीनचे नियोजन केले आहे.
कृषी विभागाने 'असे' केले खताचे नियोजन
यावर्षी खरीप पिकासाठी 2.11 लाख क्विंटल खत लागणार आहे. कृषी विभागाकडून आजपर्यंत 63 हजार क्विंटल खत उपलब्ध झाले आहे. काही दिवसात उर्वरित खताचे नियोजन केले जाणार असल्याचेही शिरसाठ यांनी सांगितले आहे.
कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या बांदावर दिले जाणार खत आणि बियाणे...
विक्री सेवा केंद्रावर आणि कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी वेगळे नियोजन केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी कृषी विभागाने राज्यभर शेतकऱ्यांना बांदावर खते आणि बियाणे मिळणार आहेत. आजपर्यंत नाशिक जिल्ह्यात 1100 गावात 62 हजार शेतकऱ्यांना शेतकरी समूह आणि कृषी विभागाच्या आत्माच्या गटामार्फत 62 हजार शेतकऱ्यांपर्यंत खते आणि बियाणे पोहोचवण्यात आली आहेत.