नाशिक : नाशिकमध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती सेनेने 21 फूट लांबीची आणि 71 किलो वजनाची 64 कवड्यांची माळ तयार केली आहे. नाशिकमध्ये ही माळ आकर्षणाचा विषय ठरत असून, शिवप्रेमी ही माळ बघण्यासाठी गर्दी करत आहे. तसेच वंडर बुक ऑफ रेकॉर्डने तिची नोंद केली आहे. नाशिकमध्ये दरवर्षी छत्रपती सेना एक आदर्श शिवजन्मोत्सव साजरा करत असते, शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे प्रतीक असलेल्या वस्तूंचे मोठ्या स्वरूपात सादरीकरण करून त्याची विश्वविक्रमात नोंद केली जाते. त्या वस्तूंचे महत्त्व जनतेसमोर सादर करत असते. याचाच एक भाग म्हणून यंदा शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती सेनेने 21 फूट लांबीची आणि 71 किलो वजनाची 64 कवड्यांची माळ तयार केली आहे. बडोदा येथे या करिता प्रत्येकी एक फूट उंचीच्या कवडी तयार केल्या गेल्या. नाशिकमध्ये कवड्यांना कोटिंग, कलरिंग केले गेले. आठ कारागिरांनी दीड महिन्यात ही भव्यमाळ तयार केली आहे.
डॉ. मालुसरे यांच्या हस्ते अनावरण : छत्रपती शिवरायांनी तानाजी मालुसरे यांना स्वतःच्या हाताने दिलेली कवड्यांची माळ (राजमाळ) त्यांची बारावी वंशज डॉ शितल मालुसरे यांनी जतन करून ठेवली आहे. डॉ मालुसरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये छत्रपती सेनेने साकारलेल्या 21 फूट लांब कवड्यांच्या माळेचा अनावरण सोहळा संपन्न झाला. छत्रपती सेना एक दरवर्षी वेगळ्या पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करत असते. याआधी छत्रपती शिवरायांचा भव्य जिरेटोप, भवानी तलवार, टाक, वाघनखे, कटियार अशा वस्तू साकारण्यात आल्या असून यांची नोंद विश्वविक्रमात करण्यात आली आहे.
शिवरायांच्या मूर्तीला अर्पण करणार : 19 फेब्रुवारी दुपारी रोजी शिवरायांची पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. सायंकाळी 7 वाजता मिरवणूक अशोक स्तंभाजवळ पोहोचल्यावर आरती झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 61 फूट उंच पुतळ्याला अर्पण करण्यात येणार असल्याचे छत्रपती सेनेने सांगितले. सुभेदार तानाजी मालुसूरे यांना कोंढाणा गडावर वीरमरण आले होते. यांच्या पार्थिवावर शिवरायांनी स्वत:च्या गळ्यातील हीच कवड्यांची माळ( राजमाळ) ठेवली होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी म्हटले होते "गड आला, पण सिंह गेला" आज या शूर पराक्रमाला साडेतीनशे वर्ष झाले आहेत. आज ही आम्ही महाराजांची आठवण जपून ठेवली आहे, असे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या 12 व्या वंशज शितलताई मालुसरे यांनी म्हटले आहे.
कवड्या कुठे आढळतात : कवडी हे समुद्रात सापडणारे, एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच आहे. शास्त्रीय दृष्ट्या सायप्रिइडी कुलातील सायप्रिया वंशाच्या सागरी गोगलगाईंच्या शंखांना कवड्या म्हटले जाते. कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत असतात. पूर्वी आफ्रिकेत, भारतात कवड्यांचा नाण्यांप्रमाणे उपयोग होत होता; त्याचप्रमाणे त्यांचा दागिने म्हणून वापर आपले पूर्वज करत असे. तसेच सारीपाट,चौसर इत्यादी खेळांमधे याचा वापर होत होता. साधू-बैरागी-वासुदेव तसेच सामान्य नागरिगसुद्धा कवडीच्या माळा गळ्यात घालतात. गायी, बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या गळ्यात कवड्यांचा वापर करण्यात येतो.
कवड्यांना धार्मिक पारंपरिक महत्त्व : कवडीला महाराष्ट्रामध्ये पारंपरिक, सांस्कृतिकदृष्ट्या अधिक महत्त्व आहे. कारण आदिशक्तीचे रूप असलेल्या तुळजाभवानीचे भक्त कवड्यांच्या माळा परिधान करतात. तशी प्रथा तुळजापुरात पूर्वापार चालत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजही कवड्यांची माळ परिधान करत होते असे, इतिहास अभ्यासकांचे मत आहे.
हेही वाचा - MP Amol Kolhe : शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकावा याकरता भगवा जाणीव आंदोलन छेडणार - खासदार डॉ.अमोल कोल्हे.