नाशिक: भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. मात्र लोकांसाठी वाहून दिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक जीवनात अनेक अडचणी आल्या आहेत. त्यातून त्यांनी मार्ग काढत वंचितांचे जीवनमान उंचावण्यासाठी कष्ट घेतले. यांच्या वैयक्तिक जीवनात दोन अशा घटना घडल्या ज्या त्यांच्या जीवावर बेतल्या असत्या. परंतु बाबासाहेबांचे शिष्य असलेले नाशिकचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी त्यांना या संकटातून सुखरूप बाहेर काढले.
पाण्यात बुडताना वाचवले: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोर्टाच्या कामानिमित्त अनेकदा नाशिकला येत असत. तेव्हा ते नाशिकला शाहू बोर्डिंगला अधीक्षक असलेले दादासाहेब गायकवाड यांच्या सोबत थांबत असे. बाबासाहेब आणि दादासाहेब यांच्यात गुरू-शिष्याचे नाते होते. दादासाहेब गायकवाड हे रोज सकाळी आंघोळीसाठी गोदावरी नदीत जात असत. एकदा बाबासाहेबांनी दादासाहेबांना मलाही नदीत पोहायचे आहे असा हट्ट धरला आणि दादासाहेब त्यांना घेऊन नदीवर गेले. मात्र समुद्र आणि नदीत फरक आहे, असे सांगून तुम्ही नदीत उतरू नका अशी विनंती गायकवाडांनी बाबासाहेबांना केली. त्यानंतरसुद्धा बाबासाहेबांनी नदीत पोहण्यासाठी उडी मारली. अशात एका ठिकाणी नदीच्या पाण्यात भवरा निर्माण झाल्याने बाबासाहेब पाण्यात बुडू लागले. बाबासाहेबांनी दादासाहेब यांना आवाज दिला. बाबासाहेब हे बुडत असल्याचे लक्षात आल्यावर दादासाहेबांनी तात्काळ धाव घेत त्यांना पाठीवर घेऊन नदीच्या बाहेर आणले. यानंतर बाबासाहेबांच्या नाका-तोंडात गेलेले पाणी बाहेर काढले. काही वेळानंतर बाबासाहेब हे शुद्धीवर आले.
अन्यथा, नाग चावला असता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाडला चवदार तळे सत्याग्रहासाठी गेले होते. तेव्हा, दादासाहेब गायकवाड हे त्यांच्या सोबत होते. या दरम्यान बाबासाहेब हे रात्री उठून आंदोलनाबाबत विचार करत रस्त्यावरून चालत होते. दादासाहेबांनी त्यांना बघितले आणि ते त्यांच्या मागे चालू लागले. रस्त्याच्या एका ठिकाणी मागून चालत असलेल्या दादासाहेबांनी अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मागून उचलून बाजूला केले. तेव्हा बाबासाहेबांनी विचारले की, काय झाले? यावेळी दादासाहेबांनी त्यांना दाखवले की, तुमच्या दोन फुटावर भला मोठा नाग फणा काढून बसला आहे आणि तुम्ही त्याच्यावर पाय देणार होते. तेव्हा देखील बाबासाहेबांना सर्पदंश झाला असता आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, असे डॉ. कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा: Mumbai HC Notice To Prithvi Shaw: पृथ्वी शॉला सपना गिल विवादाप्रकरणी उच्च न्यायालयाने बजावली नोटीस