नाशिक Jarange Patil Offer To Ajit Pawar : अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडताना काळजी घेण्याची तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर आता आरक्षणाचीही तंबी देऊन टाका. लगेच आरक्षण दिलं तर मी नाशिक मधूनच घरी जातो आणि तुमच्या सत्कारासाठी ट्रक भर गुलाल आणि फुलं आणतो, मराठ्यांची लाखो पोरंही आणतो. आणखी काय सन्मान पाहिजे तुम्हाला? अशी ऑफर मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना दिली आहे. जरांगे पाटील नाशिकला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. (Maratha Reservation Issue)
मराठा आरक्षणावरून अजित पवारांची बैठक : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी करत जरांगे पाटील यांनी राज्यभर ठिकठिकाणी सभा घेत आक्रमक आंदोलन उभं केलं आहे. या मागणीला विरोध केल्यानं राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील असा संघर्ष निर्माण झाला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात वातावरण तापू लागल्यानंतर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शासकीय देवगिरी या निवासस्थानी त्यांच्या गटातील आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाबाबत जपून बोलण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच, अजित पवारांना खास ऑफर दिली. तुम्ही आरक्षण दिलं तर मी नाशिक मधूनच घरी जातो आणि तुमच्या सत्कारासाठी ट्रकभर गुलाल आणि फुलं आणतो, मराठ्यांची लाखो पोरंही आणतो, आणखी काय सन्मान पाहिजे तुम्हाला, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलयं.
जरांगे पाटलांची सरकार विरोधात भूमिका : सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या नाशिक मधील सभेत छगन भुजबळांकडून होत असलेल्या वैयक्तिक आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तुम्ही मुंबईत काय केलं, कुठे भाजी विकली, कोणाचा बंगला हडप केला हे सगळं मला माहीत आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला उद्देशून सांगितलं की, मुंबईत येण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. आम्ही संपूर्ण आंदोलन शांततेत पूर्ण केलं होतं; परंतु आमच्यावर सरकारच्या आदेशावरून हल्ला करण्यात आला. सरकार आंदोलन दडपण्यासाठी कारस्थान करत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली.
हेही वाचा: