नाशिक - आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीवर दबाव असल्याचा आरोप केला आहे. याबाबत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारले असता, राज्यपालांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे ते सकारात्मक निर्णय घेतील. परंतू त्यांच्यावर अदृश्य दबाव असल्याचा टोला लगावत भुजबळांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. कोरोना आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते.
'राज्यपाल निश्चितपणे सकारात्मक विचार करतील' -
बारा आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान राज्यपालांनी घटनात्मक कर्तव्य लवकरात लवकर पार पाडावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत छगन भुजबळांना विचारले असता ते म्हणाले, न्यायालयाने काय इशारा दिला आहे, हे समजून घ्यावे. मला वाटते राज्यपाल निश्चितपणे सकारात्मक विचार करतील. न्यायालयाने आदेश नव्हे निर्देश दिले आहेत. न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे ते निश्चित सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा करू या, असेही ते म्हणाले.
तिसऱ्या लाटेसाठी पूर्व तयारी सुरू ठेवावी -
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या स्थिर आहे. परंतू अद्याप हजारापेक्षा कमी होत नसल्याने त्याचप्रमाणे निर्बंध शिथिल करून उद्योग व्यवसायांची वेळ वाढवून देण्यात आली असल्याने नागरिकांनी सतर्कता ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते.
लग्नात गर्दी टाळावी -
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, लसीकरणासाठी ज्या प्रमाणात लसी उपलब्ध होत आहेत. त्यानुसार लसीकरणाचे काम सुरू आहे. आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी यांना सरसकट कमी न करता आवश्यकतेनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत निर्णय घेण्यात यावा. लग्न समारंभामध्ये होणारी गर्दी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असून अशा समारंभात मास्कचा वापर अनिवार्य करणे गरजेचे असून यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात तयार करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत. विद्युत विभागाने सर्व ऑक्सिजन निर्मीती प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सर्व संबंधित कामे पूर्ण करावीत, असे पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
'24 ऑक्सिजन निर्मीती प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प सुरू' -
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्याची कोरोना सद्यस्थिती सादर करतांना सांगितले की, जिल्ह्यातील 24 ऑक्सिजन निर्मीती प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प सुरू झाले आहेत. तसेच उर्वरित प्रकल्पांचे काम प्रगती पथावर असून 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. पहिल व दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण 28.08 टक्के झाले असून लसी उपलब्धतेनुसार लसीकरणाचे काम सुरू आहे, असे जिल्हाधिकरी मांढरे यांनी बैठकीत सांगितले.
'पेयजलाचे प्राधान्याने नियोजन करावे' -
जिल्ह्यात पर्जन्यमानाचे अल्प प्रमाण पाहता पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच पाणी आराखड्यानुसार अभ्यास करून पाणी आवर्तन वाटपाबाबत योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बैठकीच्या वेळी महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची माहिती पालकमंत्री भुजबळ यांना सादर केली.
हेही वाचा - दानिशने आमच्याकडून परवानगी घेतली नव्हती, तालिबानचे सिद्दीकींच्या मृत्यूवर स्पष्टीकरण