नाशिक - जखमी अवस्थेत एकलहरे परिसरात असलेल्या बिबट्याला वाचविण्यात स्थानिक नागरिक व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. जेसीबीच्या सहाय्याने बिबट्याला उचलून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रोपवाटिकेत दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहे. तब्बल तीन ते चार तास वनविभागाचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी रेस्क्यू ऑपरेशन केल्यानंतर या बिबट्याला जीवदान मिळाले आहे.
गेल्या काही दिवसापासून एकलहरे परिसरातील डोंगरावर 4 बिबटे मोठ्या प्रमाणात मुक्त संचार करत असल्याचे नागरिकांना आढळून आले आहे. आज (रविवारी) सुद्धा हे बिबटे एकलहरे परिसरातील डोंगरावर फिरत असताना या चार बिबट्यापैकी एका बिबट्याचा डोंगरावरून पाय घसरल्याने खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. परिणामी या बिबट्याचा मनका तुटल्याने त्याला चालता येत नव्हते. दरम्यान याच परिसरात नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या कर्मचाऱ्यांना हा जखमी बिबट्या दिसला. त्यानंतर काही नागरिक व वनविभागाच्या मदतीने बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र मोठ्या जोखीमीने जेसीबीच्या सहाय्याने या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. जखमी बिबट्यावर पुढील उपचार वन विभाग करत आहे.
हेही वाचा - पुष्पक एक्स्प्रेस घटना : अत्याचार अन् दरोडा प्रकरणी आठ जण अटकेत