नाशिक: जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. विहिरीचे खोदकाम करत असताना स्फोटात तीन जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आली आहे. विहिरीचे खोदकाम करताना बार उडवण्यात आला यावेळी लहू महाजन, विभीषण जगताप, आबा बोराडे हे तीनही मजूरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी गावात ग्रामपंचायतच्या विहिरीचे खोदकाम सुरू होते. यावेळी विहिरीत काम करत असताना बार लावण्यात आला. मात्र याचवेळी कामगार देखील काम करत होते.
एक जण गंभीर जखमी: अचानक बार उडाला यावेळी विहिरीत काम करत असलेल्या तीनही कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर यातील एक जण गंभीर जखमी झाला. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर तात्काळ रोहिले प्राथमिक उपचार केंद्रातून रुग्णवाहिका बोलावण्यात आली. जखमींना नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर तिघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या घटनेची माहिती मिळतच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, घडलेल्या दुर्घटनत मृत्यू झालेले मजूर बीड जिल्ह्यातील आष्टी या गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.