नाशिक - नवीन नाशिक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुद्ध विहार ते उपनगर दरम्यान असलेल्या खड्ड्यांसमोर रांगोळी काढत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - भुजबळही सर्व पक्षाचे होवोत, राज्यपालांची भुजबळांना भाजपात येण्याची ऑफर ?
नवीन नाशिक भागातील प्रभाग क्रमांक 29 मध्ये असलेल्या बुद्ध विहार ते उत्तम नगर परिसरातील मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच परिसरात शालेय विद्यार्थी आणि वाहनचालकांची नेहमी वर्दळ असते. या रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, असे असताना देखील स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे, लोकप्रतिनिधींच्या या हलगर्जीपणाचा निषेध नोंदवण्यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुद्ध विहार ते उत्तम नगर परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यांवर रांगोळी काढून काळे झेंडे दाखवत आंदोलकांनी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचा निषेध केला.
रस्ते लवकर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू..
या आंदोलनाची दखल घेत लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर रस्ते दुरुस्तीची कामे हाती घ्यावे, अन्यथा येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे देण्यात आला.
हेही वाचा - राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या हस्ते देव मामलेदार यशवंतराव महाराज स्मारकाचे भूमिपूजन