नाशिक - मोसम नदीपात्रात वाळू माफियांककडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे नामपूर-साक्रीला जोडणारा पूल धोकादायक बनला आहे.
नाशिकच्या सटाणा, नामपूर, मालेगाव भागातून वाहणारी मोसम नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. वाळू माफियांनी थेट या नदीवर असलेल्या मुख्य पुलाच्या पिलरच्या पायथ्याशी मोठ मोठे खड्डे केले आहेत. त्यामुळे पिलर उघडे पडले असून, हा पूल धोकादायक बनला आहे. नामपूर व साक्रीला जोडणार हा पूल असून त्याच्यावरून चोवीस तास वाहतूक सुरू असते. मात्र, पिलरच्या पायथ्याशी ठिकठिकाणी खड्डे झाल्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक झाला आहे. या पात्रातून दिवसा ढवळ्या वाळू चोरी केली जात असताना देखील महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. वाळू उपशामुळे या भागातील पाण्याचप प्रश्नदेखील गंभीर स्वरूप धारण केले आहे.
अवैधरित्या दिवसा ढवळ्या नदीपात्रातून होणारी चोरी महसूल विभाग आणि पोलिसांना का दिसत नाही का? वाळू माफिया आणि महसूल पोलीस विभागाचे आर्थिक हितसंबंध आहेत का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पुलाच्या पिलर खालील वाळू काढल्याने पूल धक्कादायक झाला आहे. दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? वाळू माफियांवर कारवाई कधी होणार? एकीकडे दुष्काळामुळे मोसम नदी कोरडी पडली असताना, भविष्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास त्याला कोण जबाबदार असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.