नाशिक - सुरगणा येथून साडे पाच लाखांचा अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आली. सुरगणा - उंबरठाण रस्त्यावर एका चारचाकीतून ही दारू नेली जात होती. त्यावेळी ही कारवाई झाली.
शुक्रवारी आंबेडकर जयंतीमुळे ड्राय डे पाळला गेला. या दिवशी देशी आणि विदेशी दारुची विक्री करण्यासाठी वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या पथकाने सरगणा उंबरठाण रस्त्यावर सापळा रचला. तेव्हा दारुसाठा वाहून नेणारी चारचाकी जाळ्यात सापडली.
अंधाराचा फायदा घेऊन चारचाकीचा चालक पळून गेला. पण, गाडीतून १९२० देशी दारुच्या बाटल्या, प्रिस सतराचे १२ बॉक्स असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेला. गाडीच्या मालकाचा शोध सुरू आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रसाद सुर्वे यांनी दिली.